1.25 लाख लाडक्या बहिणींच्या पडताळणीला सेविकांचा नकार:अपात्र ठरण्याची भीती, आयटी विभागाची बालविकासला पडताळणीसाठी यादी सादर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हाभरातून सुमारे १२ लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी सुमारे १.२५ लाख लाडक्या बहिणींवर अपात्र ठरण्याची टांगती तलवार आहे. स्थानिक पातळीवर या यादीची पडताळणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतू, अंगणवाडीताईंनी यादीच्या पडताळणीस नकार दिला. माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरली. अर्जांच्या अनेक टप्प्यांच्या पडताळणीनंतर पात्र ठरवलेल्या लाडक्या बहीणींना दरमहा १५०० रूपयांचा लाभ देण्यात आला. ज्या लाडक्या बहिणी शासकीय सेवेत असतील, किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असेल त्यांना अपात्र ठरवण्याचा निकष आहे. याच निकषावर बोट ठेऊन, महिला व बालकल्याण विभागाने राज्यभरातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती मागवली. जिल्हाभरात सुमारे १२ लाखांवर लाडक्या बहीणी लाभ घेत आहेत. आयटी विभागाने व्हेरिफाय करून जिल्ह्यातील सुमारे १.२५ लाख अपात्र लाडक्या बहीणींची यादी पाठवली आहे. आता या यादीनुसार २१ वर्षाखालील व ६५ वर्षावरील लाभ घेणारी महिला तसेच एकाच कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेतात का ? याची पडताळणी सेविकांमार्फत करण्याचे नियोजन आहे. परंतू, साई श्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना एफआरएसचे काम पुरक पोषण आहार, सर्वे अद्ययावत करणे, गरोदर माता नोंदी ठेवणे, जन्म व मृत्यू नोंदी, लाभार्थी वजन घेणे व मोबाईलचे ऑनलाईन कामकाज, हजेरी अशी कामे आहेत. आधीच भरपूर काम आहे, आणि बाहेरील काम दिल्यास मुलांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची पडताळणी आणि मातृ वंदनाचे काम सेविकांकडून करणे शक्य होणार नाही. पर्यायी व्यवस्था करावी, असे पत्र दिले. लाभ सोडण्यासाठीची पद्धत कशी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडायचा आहे, अथवा त्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील अशा लाडक्या बहीणींना लाभ सोडता येतो. लाभ नको असल्याबाबत तालुका अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे पत्र द्यावे. अर्ज दिल्यानंतर लाभ केला जातो, असे अहिल्यानगर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने सांगितले. वयोगटात न बसणाऱ्या १७ हजार महिला एकाच कुटुंबात वयोगटात न बसणाऱ्या २१ वर्षाखालील व ६५ वर्षावरील १७ हजार महिला आहेत. याव्यतिरिक्त एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या १.१० लाख आहे. या सर्व महिलांची पडताळणी केली जाणार आहे. त्यात ज्या अपात्र ठरतील त्यांचे लाभ बंद केले होतील. संजय कदम, महिला व बालविकास अधिकारी.

What's Your Reaction?






