जळगाव रोडला काँक्रिटीकरण पूर्ण होण्याआधीच पडले तडे:रस्त्यावर पाणी मारण्यासाठी अंथरलेली पोती कडेला टाकल्याने दुर्गंधी
सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंटदरम्यानच्या सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सध्या त्यातील आंबेडकर चौक ते जाधववाडी टी पॉइंट या हर्सूलकडे जाणाऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहतूक सुरू आहे. मात्र, त्या मार्गावर काही ठिकाणी तडे पडले असून काही दिवसातच त्यांचे मोठे खड्डे होतील अशी चिन्हे आहे. बहुप्रतीक्षित असलेल्या या मार्गावर पूर्णत्वाच्या आधीच तडे पडल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण होत आहे. सद्य:स्थितीत गरवारे कंपनी ते जाधववाडी टी पॉइंट या एकमेव टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यालाही तडे पडले आहेत. रस्त्यावर पाण्याची ओल दीर्घकाळ टिकावी म्हणून पोते अंथरले जातात. काम पूर्ण झाल्यावर पोत्यांची योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मात्र, या ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच ही पोती पडून आहेत. सध्या पावसाळी दिवस असल्याने ते सातत्याने ओले होऊन त्यातून दुर्गंधी सुटली आहे. आतल्या रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा सिडकोकडून हर्सूलकडे जाणाऱ्या मार्गावर काम केले आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कुठेही प्रत्यक्ष काम सुरू नसल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. पण, एका बाजूचा काही टप्प्यातील रस्ता बंद केला आहे. दुसऱ्या बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. त्यात दोन्ही बाजूची वाहतूक एकाच मार्गाने होत असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होते. मुख्य रस्त्यावर वर्दळ असल्याने नागरिक टीव्ही सेंटर, बजरंग चौक, चिश्तिया चौक या अंतर्गत मार्गांचा वापर करतात. त्यामुळे या अंतर्गत रस्त्यावरदेखील रोज वाहतूक कोंडी होत आहे. साइड ड्रेनची खडी उघडी पडली रस्त्याच्या डाव्या बाजूला पाण्याचा निचरा व्हावा म्हणून ४ ते ५ फुटांचे डक्ट तयार केले आहेत. तेथे भिंती उभारून स्लॅब टाकला आहे. मात्र, या स्लॅबच्या वरच्या भागातील खडी बाहेर पडत आहे. त्यामुळे हा स्लॅब कोसळून शकतो. रस्ता तपासून घेणार सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. हस्तांतरावेळी रस्त्याची तपासणी केली जाईल. काही त्रुटी आढळल्यास त्या दूर केल्या जातील. ३० महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल. - सुनील ठाकरे, कार्यकारी अभियंता. पीडब्ल्यूडी

What's Your Reaction?






