रस्त्यांची झाली चाळण:तिवसा तालुक्यातील मंजूर ग्रामीण रस्त्यांची कामे रखडली, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
तिवसा तालुक्यातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. विधानसभा निवडणुका होऊन आठ महिने उलटले तरीही या कामांना मुहूर्त मिळालेला नाही. भूमिपूजन झालेल्या रस्त्यांची खड्डेमय स्थिती कायम आहे. भर पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना याच रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून तालुका काँग्रेसने रखडलेली कामे तातडीने सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश वानखडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत गट ब मधील विविध लेखाशीर्षांतर्गत रस्त्यांची सुधारणा करण्याचे ठरले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. भूमिपूजनही झाले होते. मात्र त्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही संबंधित कंत्राटदार आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली नाही. या परिस्थितीमुळे काही दिवस बस सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांचे हाल झाले. रस्त्यांची चाळण झाल्याने पावसाळ्यात विद्यार्थी, वाहन चालक आणि करजगांव लगतच्या शाळेतील मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. संतप्त नागरिकांनी भूमिपूजनाचे फलकही फेकून दिले आहेत. रस्ते खराब असल्याने बस सेवा विस्कळीत झाल्यामुळे तिवसा येथून शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना जावरा गावी पोहोचायला सायंकाळी ७-८ वाजतात, अशी तक्रार ग्रामवासियांनी तिवसा तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष वैभव वानखडे यांना केली आहे.

What's Your Reaction?






