महाराष्ट्र, कर्नाटक, बिहारच्या मतदार याद्याच वेबसाइटवरून गायब:जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; चोरी सिद्ध झाल्याचा दावा
महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार या राज्यांच्या मतदार याद्या वेबसाइटवरून गायब झाल्या आहेत किंवा या वेबसाईट पर्यंत आता पोहोचताच येत नाही. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र आता चोरी सिद्ध झाली असल्याचा दावा देखील त्यांनी केला. चोराने कितीही लपवालपवी केली तरी आता काही फरक पडणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. चोर चोरीला लपवण्यासाठी धावपळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर लोकांची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे त्या याद्या वेबसाइटवरून गायब करून टाकल्या असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. चोराने चोरी केली आहे, हे आता पुराव्यानिशी सिद्ध केले असल्याचे देखील ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा या संदर्भात आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. या मध्ये त्यांनी म्हटले की, 'चोर चोरी लपवण्यासाठी धावपळ करतोय. राहुल गांधी यांच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर लोकांची वाढलेली उत्सुकता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाइटवरून गायब करून टाकल्या. किंबहुना, त्या वेबसाईट पर्यंत आता पोहोचताच येत नाही. चोराने चोरी केली आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. आता चोर कुठेही लपला किंवा चोराने कितीही लपवालपवी केली तरी काय फरक पडतो? चोरी तर सिद्ध झालीच आहे.' राहुल गांधी यांचा आरोप- EC ने BJP सोबत मिळून निवडणूक चोरली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादीतील अनियमिततेवर १ तास ११ मिनिटे २२ पानांचे सादरीकरण दिले. राहुल गांधी यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि सांगितले की, मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत.ते म्हणाले की, महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर निवडणूक चोरीला गेल्याचा आमचा संशय निश्चित झाला. मशीन रीडेबल मतदार यादी न देऊन, निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्र निवडणूक चोरली आहे याची आम्हाला खात्री पटली. राहुल म्हणाले की, आम्ही येथे मत चोरीचे एक मॉडेल सादर केले, मला वाटते की हे मॉडेल देशातील अनेक लोकसभा आणि विधानसभेत वापरले गेले होते. कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या बूथच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आहे. अनेक ठिकाणी यादीतील लोकांचे फोटो नाहीत. त्याच वेळी, अनेक ठिकाणी बनावट पत्ते लिहिले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

What's Your Reaction?






